Ad will apear here
Next
करा आम्हाला निर्भय, निर्मळ, उजळू द्या जीवना...
गिरीश कुलकर्णीकाम करण्याची इच्छा आणि ऊर्जा माणसाला कामाच्या किती वाटा दाखवते याचं ‘स्नेहालय’ हे एक आदर्श उदाहरण. तळागाळातल्या घटकांची उपेक्षा थांबवण्यासाठीचं काम हेच आयुष्याचं ध्येय असण्याच्या विचारानं झपाटलेल्या गिरीश कुलकर्णी या तरुणानं सुरू केलेली ही संस्था गरीब, निराधार, अनौरस, ‘एचआयव्ही’बाधित मुला-मुलींचं, महिलांचं हक्काचं घर बनली आहे. युवा निर्माण प्रकल्प, चाइल्डलाइन यांसारखे अनेक उपक्रमही ही संस्था चालवते. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’मध्ये आज पाहू या गिरीश कुलकर्णींची प्रेरणादायी वाटचाल...
..............
चराचराच्या सर्व शक्तींनो, ही आमची प्रार्थना
करा आम्हाला निर्भय, निर्मळ, उजळू द्या जीवना
विद्येवर निष्ठा ठेवू या, उद्योगाची कास धरू या
साहस शिकवा, संयम शिकवा, द्या जीवन चेतना
नको कधी तो गर्व यशाचा, नको कधी आळस कामाचा
द्वेष कोणाचा नको कधीही शिकवा सहभावना
रक्षण करणे या सृष्टीचे वाटो आम्हा अतिमोलाचे
ममतेची आणि समतेची द्या आम्हा प्रेरणा

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे’ या संस्थेच्या चित्रा नाईक यांनी लिहिलेली ही प्रार्थना मला खूपच आवडते. मनाचा तळ शोधायला भाग पाडणारी ही प्रार्थना मी आदिवासी भागात काम करत असताना तिथे आम्ही रोज म्हणत असू. आजही काही उदात्त, सुंदर, प्रेरित करणारं कोणाचं काम बघितलं, की या ओळी आपोआपच ओठांवर येतात. या प्रार्थनेच्या ओळी आपल्या आयुष्यात उतरवणारी एक व्यक्ती मला अहमदनगर या शहरामध्ये भेटली आणि तिचं काम बघून मी थक्क झाले. 

अहमदनगर शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तसंच इथं निरनिराळ्या सामाजिक संस्था कार्य करताना दिसतात. तसंच याच शहरात आणि आजूबाजूच्या लहान-लहान गावात साधू-बाबा यांचंही प्रस्थ कधीकाळी असल्याच्या खाणाखुणा बघायला मिळतात. नाटक, साहित्य, कला अशा गोष्टींनीही हे शहर आपलं नाव सर्वत्र कोरून आहे. सध्या सारेगमप लिटल चॅम्प म्हणून प्रसिद्धी पावलेली अंजली गायकवाड ही चिमुरडी अहमदनगरचीच! 

अशा या शहरात ‘स्नेहालय’ नावाची संस्था आज सामाजिक क्षेत्रात खूप मोठं काम करतेय. या संस्थेचे संस्थापक आहेत गिरीश महादेव कुलकर्णी. ‘स्नेहालय’चा प्रवास जाणून घ्यायचा असेल, तर आधी गिरीश कुलकर्णी या तरुणाचा प्रवास जाणून घ्यावा लागेल. गिरीश कुलकर्णी हा अतिशय उत्साही, हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्वावाचा तरुण! लहानपणापासूनच इतरांच्या मदतीला धावणारा, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून स्वतः आनंदित होणारा! गिरीश नगरच्या भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात शिकत असताना त्याला त्याच्या आसपास देहव्यापार करणाऱ्या मुली आणि स्त्रिया दिसत असायच्या. रोज शाळा सुटल्यावर गणित आणि विज्ञान या विषयांच्या शिकवणीसाठी तो चित्रा गल्लीत जायचा, तेव्हा त्याच्याच वयाच्या मुली त्याला बाजारात उभ्या असाव्यात अशा विचित्र, भडक, चेहऱ्यावर रंगरंगोटी केलेल्या अवस्थेत हातवारे करताना दिसायच्या. या मुलींकडे बघून गिरीश खूप अस्वस्थ व्हायचा. आपल्याच वयाच्या या मुली, मग त्या अशा अवस्थेत का राहताहेत? आपल्यासारखं त्यांना शाळेत जायला का मिळत नाहीये? त्यांना नेमकं कुठलं काम करावं लागतंय, की सगळ्या लोकांची तुच्छतेची नजरच त्यांना झेलावी लागतीये, असे प्रश्न त्याच्या मनाला पडत. 

गिरीश जसजसा मोठा होत होता, त्याची समज वाढत होती, तसतसं या मुली जगत असलेलं एक वेगळंच विश्वच त्याच्या समोर आलं. या मुलींची जनावरासारखी अवस्था पाहून त्याचं मन बेचैन झालं. त्यातली एक आपलीच बहीण असली असती तर.... या चित्रा गल्लीतल्या मध्यमवयीन स्त्रीकडे बघून ही आपली आई असती तर.... असे विचार मनात येऊन त्याची अस्वस्थता आणखीच वाढत असे. शाळेत आपण ‘भारत माझा देश आहे’ अशी प्रार्थना शिकतो, म्हणतो. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ असं म्हणताना ते कर्तव्य मी निभावतोय का, असा प्रश्ना गिरीशला पडत असे. आपण काहीतरी करायला हवं यासाठी गिरीशचं मन रोजच आक्रोश करायचं; पण नेमकं काय हे कळत नव्हतं; मात्र योग्य वेळ येताच त्याच्यातल्या ऊर्जेला वाट मिळणार होती. 

गिरीशचं शालेय जीवन संपलं आणि त्यानं महाविद्यालयीन जगात प्रवेश केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना शेकडो चळवळी आणि आंदोलनं यात तो सहभागी झाला. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारताचं दर्शन त्याला या भटकंतीमध्ये झालं. याच काळात त्याचं महात्मा गांधी आणि विवेकानंद या दोन थोर पुरुषांवरचं वाचन झालं. त्यांचे विचार त्याच्या मनात रुजत गेले. त्यांच्या कार्यानं तो प्रभावित झाला. त्याच्या विचारांना स्पष्टता आली. आपल्याला आपल्या देशाची सेवा करायची असेल म्हणजे काय करावं लागेल, या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं. आपल्या आजूबाजूच्या गरीब, दुर्बल, अशा तळातल्या सर्व घटकांची उपेक्षा थांबवण्यासाठीचं काम करणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे, असं गिरीशच्या मनानं पक्क ठरवलं. आपल्या सर्व क्षमता याच समाजघटकांसाठी वापरायच्या गिरीशनं निर्धार केला आणि इथूनच ‘स्नेहालय’चा प्रवास सुरू झाला. 

गिरीश एक सुशिक्षित तरुण होता. त्याला काम करण्याआधी आजूबाजूला दिसणारे प्रश्न, समस्या यांच्या मुळापर्यंत जायला हवं होतं. फक्त भावनाशील होऊन काम करणं उपयोगाचं नव्हतं. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागणार होतं. १९८८ साली गिरीशनं नगरच्या चित्रा गल्लीत फिरून तिथल्या वेश्यांचं सर्वेक्षण केलं. हा प्रकल्प हाती घेणं आणि पूर्ण करणं ही खरं तर अजिबात सोपी गोष्ट नव्हती. कारण वेश्याव्यवसाय करायला भाग पाडल्या गेलेल्या मुली, स्त्रिया भीतीमुळे आणि त्यांच्यावरच्या दबावामुळे बोलायलाही घाबरत. कुंटणखाना चालवणाऱ्या चालकांना गिरीश म्हणजे पोलिसांचा खबऱ्याच आहे असं वाटून ते त्याला त्रास देत आणि वेळप्रसंगी धमक्याही देत. अनेकदा तर गिरीशला या कामात मारहाणही सहन करावी लागली; पण तो डगमगला नाही. धमक्या, मारहाण, सारं काही सहन करत तो या चित्रा गल्लीत जातच राहिला. याचा परिणाम अखेर व्हायचा तोच झाला. तिथल्या स्त्रियांना गिरीशबद्दल विश्वास वाटू लागला. त्या त्याच्याजवळ आपल्या मनातल्या वेदना बोलू लागल्या. आपलं आयुष्य तसंही उद्ध्वस्त झालंय; पण आपल्या मुलांचं आयुष्य तरी या नरकात जाऊ नये असं त्यांना वाटायचं; पण त्यासाठी बाहेर कसं पडायचं हे त्यांना ठाऊक नव्हतं. गिरीशच्या येण्यानं त्यांना आशेचा किरण थोडाबहुत दिसायला लागला होता. 

या स्त्रियांच्या धंद्याची वेळ होत असे, तेव्हा त्यांची मुलं गल्लीत बाहेर थांबायची. आईच्या-बहिणीच्या गिऱ्हाइकासाठी दारू, सिगारेट, गुटखा आणून देण्याचं काम करायची. पुढे याच सवयी मुलांनाही लागायच्या. काही विकृत ग्राहक लहान मुलींचं वयही न पाहता त्यांचं लैंगिक शोषण करायचे. अशा दाहक अनुभवांतून जाणारी ही मुलं अकाली प्रौढ व्हायची. मुली आपल्या आईच्याच पावलावर पाऊल टाकायच्या, तर मुलं या धंद्यात पुढे दलालाचं काम करायची. नात्यांविषयीच्या सगळ्या कोमल भावना मरून गेलेल्या असायच्या. थंड, गोठलेल्या डोळ्यांनी ही मुलं यंत्रवत काम करत असायची. 

गिरीशनं या मुलांच्या प्रश्नावर सुरुवातीला काम करायचं ठरवलं. महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १४च्या मैदानावर संध्याकाळी त्यानं एक उपक्रम सुरू केला. अनेक मुलं तिथं जमा व्हायला लागली. खेळ, गप्पा-गोष्टी, खाऊचं वाटप, शुभंकरोती असं सगळं व्हायचं; पण प्रश्न  सुटत नव्हते. कारण ही मुलं परतून जेव्हा आपल्या वस्तीत जायची, तेव्हा त्यांच्यासाठी तेच जगणं परत पुढ्यात असायचं. एकीकडे शुभंकरोती प्रार्थना, तर दुसरीकडे वस्तीतल्या घाणेरड्या शिव्या... गिरीश आणि त्याचे कार्यकर्ते मित्र यांच्यासाठी हे फारच विदारक चित्र होतं. गिरीशजवळ स्वप्नं होती, काम करण्याची अफाट ऊर्जा होती, जवळच्या मित्रांची साथ होती; पण त्याचबरोबर जागा, इमारत, पैसा यांपैकी काहीही नव्हतं. 

‘जे नाही ते साध्य करायला हवं,’ हे गिरीशनं ताडलं आणि त्यानं एके दिवशी आपल्या जुन्या, मंगळवार बाजारातल्या वाड्यात या मुला-मुलींना आणलं. कुलकर्ण्यांचा वाडा आता या मुला-मुलींचं आश्रयस्थान बनला. त्यांच्यासाठी ते हक्काचं घर बनलं. त्या काळी गिरीश अहमदनगरमध्ये जिथे कुठे लग्न समारंभ असतील तिथे जायचा, किंवा हॉटेल्समध्ये फेऱ्या मारायचा. शिल्लक राहिलेलं अन्न आपल्याला द्यावं अशी विनंती करायचा. प्रत्येक वेळी चांगलाच प्रतिसाद मिळायचा असंही नाही; पण गिरीशला या कामाची कधीही लाज वाटली नाही. कुठलंही काम करण्यात आता त्याला कमीपणा वाटत नव्हता. गिरीशच्या आश्रयाला आलेली मुलं खूप समंजस होती. कधी जेवायला मिळालं नाही, तरी ती कुरकुर करत नसत. ती मुलं केवळ प्रेमाची भुकेली होती. गिरीशला या कामात त्याचा भाऊ मनीष, आई शोभा आणि वडील महादेव कुलकर्णी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्यामुळेच ‘स्नेहालय’ची सुरुवात कुलकर्णी वाड्यात होऊ शकली. पुढे गिरीशचं लग्न झालं आणि डॉ. प्राजक्ता हिची साथही त्याला ‘स्नेहालय’च्या कार्यात मिळाली.

स्नेहालय संस्थेचं काम बघता बघता खूपच वाढलं आणि १७ पेक्षा जास्त प्रकल्पांत त्याचा विस्तार होत गेला. ‘स्नेहालय’चं पुनर्वसन संकुल असून, तिथे लाल बत्ती भागातली गरीब, निराधार, अनौरस, ‘एचआयव्ही’बाधित मुलं-मुली आहेत. त्यांना तिथं राहता येतं, चांगलं भोजन, आरोग्य, शिक्षण देण्याचं काम या संकुलामार्फत घडतं. या मुलांना पालकही मिळतात, जे त्यांना मानसिक आधार देण्याचं काम सातत्यानं करतात. या संस्थेत आज ४००च्या वर मुलं-मुली असून, आजपर्यंत हजारो मुलामुलींनी याचा लाभ घेतला आहे. 

स्नेहांकुर‘स्नेहालय’मध्ये अनौरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला आणि त्यांची मुलं यांचं कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केलं जातं. आजपर्यंत २४६ मुलांना हक्काचं कुटुंब मिळालंय. ४१५ कुमारी माता आणि बलात्कारित स्त्रिया यांचं पुनर्वसन झालंय. माता आणि मुलं यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारं हे केंद्र असून, मुलांना गंभीर आजार असला तरी त्यांचा सांभाळ करणारं ते मायेचं केंद्र आहे. 

‘स्नेहालय’तर्फे अहमदनगर शहरातल्या नऊ, श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगांव आणि पुणे जिल्ह्यातल्या कात्रज इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये बालभवन उपक्रमांतर्गत काम चालतं. मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यावर कामाचा भर आहे. झोपडपट्ट्यांमधली शेकडो/हजारो मुलं या उपक्रमामुळे प्राथमिक शाळांमध्ये जायला लागली. 

देहव्यापारात अडकलेल्या, तसंच कला केंद्र, तमाशाचं क्षेत्र यातल्या स्त्रियांचं जीवन बदलावं, यासाठी ‘स्नेहालय’च्या स्नेहज्योत या उपक्रमाद्वारे प्रयत्न केला जातो आणि या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रकल्पाचा लाभ नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या साडेतीन ते चार हजार स्त्रियांनी घेतला असून, आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. तसंच समलिंगी, तृतीयपंथी स्त्री-पुरुष यांच्या आरोग्यावरही इथे काम केलं जातं. त्यांना हव्या त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. 

अडचणीत सापडलेली मुलं, बालकामगार, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुली यांच्यासाठी चोवीस तास चाइल्डलाइनचं काम चालतं. १०९८ या टोल-फ्री दूरध्वनी क्रमांकावर त्यांना सेवा पुरवली जाते. इथल्या कम्युनिटी सेंटरद्वारे ‘एचआयव्ही’बाधित रुग्णांसाठी मोफत आरोग्यसेवा पुरवली जाते. त्यांच्यासाठी खास रुग्णालयाची व्यवस्था आहे. त्याचा लाभही आजपर्यंत हजारो रुग्णांनी घेतला आहे. ‘स्नेहालय’मधल्या मुलांसाठी, तसंच लालबत्ती भागातली, झोपडपट्टीतली, औद्योगिक कामगार वस्तीतली मुलं यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळाही सुरू करण्यात आली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात एकही अल्पवयीन मुलगी देहव्यापाराच्या क्षेत्रात दिसता कामा नये, अशी कठोर भूमिका घेऊन ‘स्नेहालय’चं मुक्ती वाहिनी पथक प्रयत्नशील असून, असाच प्रयत्न राज्यभर करण्याचाही त्यांचा मानस आहे. हिंमतग्राम या उपक्रमाद्वारे ‘एचआयव्ही’बाधित रुग्णांचं पुनर्वसन केलं जातं. गरीब मुलांना संगणक प्रशिक्षण देण्याचं काम आयटी सेंटरमार्फत केलं जातं. शोषित, वंचित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी २०११पासून ‘स्नेहालय’चं कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू झालं असून, या घटकांना आपला हक्काचा आवाज देण्याचं काम या रेडिओमार्फत केलं जातं. 

युवा निर्माण
स्नेहाधार प्रकल्पांतर्गत विधवा, परित्यक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त स्त्रिया यांना निवास, भोजन, कायदेशीर सल्ला, समुपदेशन दिलं जातं. याचा लाभही अनेक स्त्रिया घेत आहेत. यात ४६५ स्त्रियांचे प्रश्न सोडवून त्यांचं पुनर्वसन, विवाह आणि त्यांना स्वगृह मिळवून देण्याचं काम या प्रकल्पांतर्गत केलं गेलं.

लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी स्नेहाधारद्वारे साप्ताहिक आधारगट चालवला जातो. एक मे २०१३पासून या संस्थेनं अशा अत्याचारित महिलांसाठी एक राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू केली. ही हेल्पलाइन अहोरात्र काम करत असून, मोफत कायदेशीर सल्ला, निवास, संरक्षण, रोजगार कौशल्य, आरोग्य उपचार या गोष्टींची सुविधा पुरवणारी देशातली खासगी क्षेत्रातली पहिली हेल्पलाइन आहे. 

‘स्नेहालय’तर्फे आज युवा निर्माण प्रकल्प चालवला जातो. यात युवकांमध्ये सामूहिक श्रम, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक ऐक्य, देशासाठी समर्पण भावना रुजवण्यासाठी वर्षभरातून दोन वेळा श्रमसंस्कार छावणी माध्यमातून जागृती केली जाते. बघता बघता ‘स्नेहालय’च्या रोपट्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं आहे. काम करण्याची इच्छा आणि ऊर्जा माणसाला कामाच्या किती वाटा दाखवते याचं स्नेहालय हे एक आदर्श उदाहरण आहे. स्नेहालय परिवारानं अण्णा हजारे यांच्याबरोबर भ्रष्टाचार आंदोलनातही सहभाग घेतला. त्यांच्या कामात अण्णा हजारेंसह अभिनेता आमीर खान आणि अनेक संस्था, तसेच मान्यवर लोक सामील झाले आहेत. 

स्नेहालय संस्था बघता बघता ३० वर्षांची होते आहे. ‘स्नेहालय’चं काम लोकवर्गणीतून चालतं. या कामाला लोकांच्या आर्थिक आणि श्रमसहयोगाची आवश्यकता आहे. आपणही स्नेहालय परिवाराचा भाग बनू शकता. याचं कारण इथे असलेल्या मुलांना, स्त्रियांना आपल्यावरही प्रेम करणारं या जगात कोणीतरी आहे ही भावना नवी आशा देणारी आहे. जगण्यासाठी त्यांना नवं बळ मिळणार आहे. कोणाच्या तरी आयुष्यात ही आशा निर्माण करण्यासाठी आपल्याला फक्त एक पाऊल उचलायचं आहे. त्यासाठी ‘स्नेहालय’ला आणि गिरीश कुलकर्णी यांना जरूर भेटा. 

संपर्क : स्नेहालय भवन, महात्मा गांधी मैदानाजवळ, अहमदनगर - ४१४००१
वेबसाइट : www.snehalaya.org, www.snehankur.org
ई-मेल : info@snehalaya.org


- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(‘अनवट वाटेवरचे वाटसरू’  हे सदर दर पंधरा दिवसांनी गुरुवारी प्रसिद्ध होते.)

(‘स्नेहालय’बद्दलची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZVLBI
Similar Posts
तू जिंदा है, तू जिंदगी की जीतपर यकीन कर समाजातले बहुतांश लोक मळलेल्या वाटांवरूनच चालणं पसंत करतात पण काही जणांना मात्र नव्या वाटा धुंडाळण्याची आस असते. त्या वाटा साहजिकच काट्याकुट्यांनी भरलेल्या असतात. तरीही जिद्दीनं ते त्या अनवट वाटांवरून चालतात आणि अनेकांच्या जगण्याची वाटचाल सुखकर करतात. नव्या वाटा शोधणाऱ्या अशा काही व्यक्ती आणि संस्थांच्या
ब्रेल मॅन ऑफ इंडिया! आपल्या संवेदनशील मनाला सतत जागं ठेवून गेली अनेक वर्षं अंधांसाठी अफाट कार्य करणाऱ्या एका मराठी तरुणाला आज जगभरातले आणि देशातले अंध वाचक आणि डोळस वाचक ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखायला लागले आहेत. ही सगळी कामं हा तरुण कुठल्याही सरकारी मदतीशिवाय किंवा अनुदानाशिवाय स्वखर्चाने करत असतो. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज या अवलियाची ओळख
‘स्लमडॉग सीए’च्या जिद्दीची गोष्ट झोपडपट्टीत राहून, समाजाची उपेक्षा आणि तिरस्कार झेलून, अनेक हालअपेष्टांना तोंड देत, परिस्थितीशी दोन हात करत एक निरागस मुलगा एका ध्येयानं झपाटतो... सीए होतो आणि आपल्या प्रतिकूल वाटेवरचा संघर्ष इतरांना करायला लागू नये, म्हणून त्यांना मदतीचा हात पुढे करतो, त्याची ही गोष्ट!... ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात
आयटी इंजिनीअर शेतीत ‘जयवंत’ होतो तेव्हा... शेती क्षेत्रात काम करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं असताना एक तरुण या क्षेत्रात येण्याचा विचार करतो.... तेही शेतीतलं काहीही कळत नसताना नि आयटी क्षेत्रातली चांगल्या पगाराची नोकरी हातात असताना... पण त्याच्या ध्यासाने तो सारं काही शिकतो, चांगल्या प्रकारे शेती करतो, शेतकऱ्यांना एकत्र आणतो, सेंद्रिय उत्पादनं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language